पुणे – सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी ट्रेड टॉवरमधील महापालिकेच्या ताब्यातील सुमारे 33 हजार चौरस फूट जागेपोटी 5 कोटी 55 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न देणाऱ्या निविदा मंजुरीसाठी शहर सुधारणा समितीसमोर अखेर आल्या आहेत.
स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिका यांच्या वादात गेल्या दीड वर्षांपासून या रकमेवर पाणी सोडण्यात येत होते. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने ही जागा व्यावसायिक वापरासाठी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्याचा अंतिम निर्णय मुख्यसभेत घेण्यात येणार आहे.
आयसीसी ट्रेड टॉवरमध्ये महापालिकेच्या मालकीचे दोन मजले असून, ते स्मार्ट सिटी कंपनीला द्यायचे की त्यांचा वापर व्यावसायिक कारणासाठी करून, त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळवायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
त्यानुसार हे मजले व्यावसायिक वापरासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यासाठीची आवश्यक निविदा प्रक्रिया राबवली होती. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने ही जागा भाड्याने देण्यासाठी तीनवेळा निविदा प्रक्रिया राबवली.
अखेर पाच कोटी 55 लाख रुपये वार्षिक भाडे देणाऱ्या कंपनीला या जागा भाड्याने देण्यासाठी करारनामा करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर ठेवला आहे.
गेल्या एक महिन्यांपासून हा प्रस्ताव प्रलंबित असून, येत्या आठवड्यात त्यावर निर्णय अपेक्षित आहे.