केपटाऊन – दक्षिण आफ्रिकेला पुराचा तडाखा बसला आहे. क्वाझुलु-नताल प्रांत आणि डर्बनमध्ये आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या 443 वर पोहोचली आहे. सुमारे चार हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. 40 हजार लोक बेघर झाले असून 13,500 घरांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 58 रुग्णालयांचेही नुकसान झाले आहे. नेटकेअर या कंपनीचे शॉन हर्बस्ट म्हणाले, “दुःखाची गोष्ट म्हणजे अजूनही घरांमधून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. विशेषत: ग्रामीण भागात जास्त मृतदेह सापडत आहेत.”
पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान –
पुरामुळे दक्षिण आफ्रिकेतील अनेक शहरांच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे येथील रस्ते, शाळा, वीज, सरकारी इमारतींचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत प्रांताच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरामुळे आतापर्यंत 63 लोक बेपत्ता आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यात यापेक्षा भयानक पूर कधीच पाहिला नाही. पूरग्रस्त भागात चार हजार लोक मदतकार्यात गुंतले आहेत.