पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेची मुदत संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ब प्रभागाची बैठक मंगळवारी पार पडली. अखेरच्या सभेत नगरसेवक भावूक झाले. आमच्याकडून चुकून काही अपशब्द वापरले गेले असल्यास माफ करा, अशा शब्दात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
मंगळवारी ब प्रभाग कार्यालयात पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सुरेश भोईर होते. उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. नागरिकांची कामे करताना लवकर कामे व्हावीत, असा त्यांचा आग्रह असतो. अशावेळी अधिकाऱ्यांशी बोलताना चुकून कधी अपशब्द निघून जाऊ शकतात. मात्र आम्ही जे बोलतो ते नागरिकांच्या कामासाठी बोलतो. यामध्ये कोणाला दुखावण्याचा आमचा हेतू नसतो. तरीदेखील नकळत आमच्याकडून काही अपशब्द निघाले असतील तर आम्हाला माफ करा, अशी भावना नगरसेवकांनी व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांत लाभलेल्या महापालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. आगामी काळातही आम्हीच पुन्हा निवडून येऊ आणि तुमच्यासोबत पुन्हा काम करू, असा विश्वास सभापती सुरेश भोईर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.