पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सिंहगड किल्ल्यावरील खाद्यपदार्थांच्या अनधिकृत स्टॉल्सचे अतिक्रमण रोखण्यासाठी वनविभागाने स्वत:च सीएसआरच्या माध्यमातून ७१ फूडस्टॉल्स उभारण्याचा निर्णय घेतला असून, याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या स्टॉल्सचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
आजूबाजूच्या गावातील अनेकांनी उपजिविकेसाठी या ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले आहेत. मात्र, ते अनधिकृत होते. तसेच या स्टॉल्सचे अतिक्रमण झाले होते. याबाबत काही ग्रामस्थ आणि पर्यटकांच्या तक्रारीनंतर २०२१ मध्ये वनविभागाला १०० पेक्षा अधिक खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर कारवाई करावी लागली. मात्र, बेरोजगारीचे कारण देत या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला.
यानंतर वनविभागानेच येथे स्टॉल्स उभारण्याचा निर्णय घेतला. फूड प्लाझाच्या धर्तीवर हे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिंहगड किल्ला क्षेत्रासाठी असलेल्या वन व्यवस्थापन समितीने याबाबत निर्णय घेतला. आणि हे स्टॉल्स सीएसआर मधून उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीला सुरूवातही केली. मे अखेरपर्यंत हा फूडप्लाझा बांधून तयार असेल असे वनविभागातर्फे सांगण्यात आले.
पहिल्या वर्षी भाडे माफ
वनविभागाने ग्रामसभेच्या मदतीने स्टॉल चालवण्यासाठी ७१ व्यक्तींनी स्वारस्य दाखवले आहे. ७१ पैकी ५६ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) कडून अधिग्रहित केलेल्या १.६ एकर जागेमध्ये हा फूड प्लाझा उभारण्यात येणार आहे.
यातील प्रत्येक स्टॉल ०८ फूट बाय १० फूट असेल. या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तो सीएसआरच्या माध्यमातून केला जाणार आहे. या स्टॉल्सचे भाडे आकारण्यात येणार आहे. परंतु पहिल्या वर्षी ते माफ केले जाणार आहे, अशी माहिती पुणे वनविभागाचे सहायक वनसंरक्षक दीपक पवार यांनी दिली.