पराग शेणोलकर
कराड -स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णात सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे. मात्र, मशीन चालविण्यासाठी तंत्रज्ञ नाही. शिवाय शहरात 10 ते 12 शासनमान्य खासगी सोनोग्राफी केंद्र सुरू आहेत. मात्र, यापैकी कोणीही उपजिल्हा रूग्णालयात येऊन शासकीय शुल्काच्या दरात सोनोग्राफी करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे येथील गरोदर महिला, पोटाचे विकार असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी शहरातील खासगी सोनोग्राफी केंद्रात जावे लागत आहे. याचा मोठा फटका गोरगरीब रूग्णांना बसला आहे. त्यामुळे कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफी मशीन तंत्रज्ञ नियुक्त करण्याची मागणी होत आहे.
कराड शहरातील लोकसंख्या लक्षात घेता येथे उपजिल्हा रूग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे शंभर खाटांचे उपजिल्हा रूग्णालय असून येथे शहरी भागास तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिक उपचारासाठी येत आहेत. परंतु, रूग्णालयच गेल्या काही वर्षापासून विविध व्याधींनी त्रस्त आहे. वैद्यकीय उपकरणे नाहीत तर तज्ज्ञ डॉक्टरांची वाणवा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा ही बाब रूग्णालयासाठी नित्याचीच बनली आहे.
या रूग्णालयात शहरातील लहान मुलांचे लसीकरण, गरोदर मातांची प्रसुती, दैनंदिन ओपीडी तसेच साथ रोग नियंत्रणासह आरोग्याशी संबंधित विविध व्याधींवर उपचार केले जात आहेत. मात्र, सोनोग्राफी, सीटीस्कॅन आदी मशीनच्या सहाय्याने महत्चाच्या तपासण्या करण्यासाठी येथे मशीन नसल्याने अनेक रूग्णांची हेळसांड होत होती. हे लक्षात घेऊन शासनातर्फे उपजिल्हा रूग्णालयास सोनोग्राफी मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पण मशीन मिळाल्यापासून तिचा वापर सुरूवातीच्या काळात काही दिवसच झाला आहे. ही मशिन चालवण्यासाठी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञांनी काम बंद केले. त्यामुळे येथील मशिन तंत्रज्ञा अभावी बंद आहे.
त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गरोदर महिलांना खासगी सोनोग्राफी सेंटरवर सोनोग्राफीसाठी जावे लागत आहे. विशेष म्हणजे, पोटाचे विकार असणारा एखादा रुग्ण या शासकीय रूग्णालयामध्ये आल्यास त्याला सोनोग्राफी मशिन बंद असल्याचे कारण पुढे करून उपचार न करता परत पाठविण्यात येते. अथवा बाहेरून सोनाग्राफी करण्यासाठी चिठ्ठी दिली जात आहे. त्यामुळे गोरगरिब लोकांना कारण नसताना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
शहरात 10 ते 12 खासगी सोनोग्राफी सेंटर सुरू आहे. येथे सोनोग्राफीकरिता गर्भवती महिलांना दोन-दोन दिवस वाट पहावी लागते. शिवाय शासकीय शुल्काच्याया चौपट पैसेही मोजावे लागत आहेत. उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफी मशीन चालविण्यासाठी तंत्रज्ञ नसल्याचा फटका संपूर्ण तालुक्यातील गोरगरीब रूग्णांना बसत आहे. त्यामुळे उपजिल्हा रूग्णालयातील सोनोग्राफी मशिनसाठी तंत्रज्ञ नेमावा अशी मागणी होत आहे.
सोनोग्राफी सेंटर चालकांची लूट
कराड शहरात सुमारे 10 ते 12 सोनोग्राफी सेंटर आहेत. तालुक्यातील विविध व्याधींनी त्रस्त असलेले नागरिक डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार सोनोग्राफी करण्यासाठी सेंटरला गर्दी करतात. शिवाय अनेकांना दोन-दोन दिवस नंबरच येत नाही. ज्या सोनोग्राफीसाठी उपजिल्हा रूग्णालयात फक्त 400 रूपये खर्च येतो त्यासाठी खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये 1800 ते 2000 हजार रूपये खर्च येत आहे. सोनोग्राफी सेंटर चालकांकडून राजरोसपणे रूग्णांची लूट सुरू आहे.