लॉकडाऊनच्या काळात बिस्किटाची विक्रमी विक्री

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच वस्तूच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला असला तरी याच काळात उपयोगी पडणाऱ्या अनेक वस्तूंच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. त्यामध्ये बिस्किटांचा समावेश आहे.

बिस्किटे सहज खाता येतात. त्याचबरोबर त्यामुळे बराच काळ ऊर्जा मिळते. या कारणामुळे लॉकडाऊनच्या काळात घरात आणि कार्यालयांमध्ये बिस्किटांचा राखीव साठा करण्याचे प्रमाण वाढले होते. भारतामध्ये 8 दशकापासून कार्यरत असलेल्या पार्ले-जी बिस्किटाची तर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये विक्रमी विक्री झाली. या कंपनीने म्हटले आहे की आमच्या 8 दशकाच्या कार्यकाळात या तीन महिन्यांमध्ये सर्वात जास्त विक्री झाली.

पार्ले प्रॉडक्‍टस्‌ या कंपनीचे विपणन अधिकारी मायंक शहा यांनी सांगितले की, या काळात आमचा बिस्किटाच्या बाजारपेठेतील वाटा पाच टक्‍क्‍यांनी वाढला. यामध्ये 80 ते 90 टक्‍के योगदान पार्ले-जी बिस्किटाचे आहे.

याबाबत बोलताना क्रिसीलचे संचालक अनुज शेट्टी यांनी सांगितले की, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सहज वापरता येणारे खाद्यपदार्थ हाताशी बाळगण्याचा ग्राहकांचा कल होता. भारतात पार्ले-जी मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गात बरीच लोकप्रिय आहेत. त्यामुळे या बिस्किटांची विक्री या काळात वाढली. वाढीव मागणीला प्रतिसाद देण्यासाठी कंपनीला धावपळ करावी लागली. मात्र उत्पादन आणि पुरवठ्याचे काम सात दिवसात यशस्वीरीत्या वाढविण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अनेक राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी आमच्याकडे अधिक पुरवठ्याचे मागणी केली. आम्ही तो पुरवठा सुरळीतपणे पार पाडला. पार्ले प्रॉडक्‍टस्‌च्या देशभरामध्ये 130 शाखा आहेत. या सर्व शाखांमध्ये या काळात कमाल उत्पादन घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.