मुंबई – चालू आठवड्यात मुंबईत इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीची दोन दिवसीय बैठक होणार आहे. त्या बैठकीला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी याही उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील लक्झरी हॉटेलमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडियाची बैठक होईल. त्या बैठकीत आघाडीतील दोन डझनहून अधिक घटक पक्षांचे नेते सहभागी होतील.
संबंधित बैठकीत इंडियाच्या लोगोचे अनावरण होणार असल्याचे समजते. त्याशिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने विरोधकांच्या अजेंड्यावरही चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जाते. पाटण्यात जूनमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीत विरोधकांची आघाडी स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाले.
जुलैमध्ये बंगळुरूतील दुसऱ्या बैठकीत आघाडीचे नाव निश्चित करण्यात आले. आता मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीमुळे विरोधकांमधील जवळीक वाढण्यास आणखी हातभार लागेल.
देशातील राजकीय महासंग्राम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा ताकदीने मुकाबला करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. ती निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे.