नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेही सहभागी झाले. संसदेत विरोधकांची संयुक्त रणनीती निश्चित करण्याच्या उद्देशातून त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
सोनियांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीवेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला, द्रमुकचे नेते टी.आर.बालूही उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनाही सोनियांनी बैठकीचे निमंत्रण दिले होते. मात्र, उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांनी आपापल्या पक्षांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राऊत आणि बालू यांना पाठवले.
आगामी काळात विरोधकांच्या अशाप्रकारच्या आणखी बैठका होणार असल्याचे समजते. त्या बैठका विरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचालींचा भाग ठरणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी स्वतंत्र राजकीय मोहीम हाती घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर, आता कॉंग्रेसही सरसावल्याचे सूचित होत आहे.