नवी दिल्ली : आगामी राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मोठी तयारी केली जात आहे. यातच राज्यसभेबाबत एक माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या आता राज्यसभेवर जाणार असल्याची शक्यता आहे. सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वी देखील सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी सोनिया गांधी हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर जाणार असल्याचे सांगितले जात होते. सोनिया गांधींच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्या लोकसभा निवडणुका लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्या राज्यसभेवर जाऊ शकतात, असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले होते.
रायबरेलीमधून लोकसभेसाठी काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागणार?
सोनिया गांधी जर राज्यसभेवर गेल्या तर त्यांचा मतदारसंघ उत्तर प्रदेश रायबरेलीमधून लोकसभेसाठी काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेस नेत्या प्रियांका वाड्रा- गांधी यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
रायबरेली काँग्रेसचा बालेकिल्ला
सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या खासदार आहेत. रायबरेलीची जागा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. उत्तर प्रदेशची रायबरेली ही जागा 66 वर्षांपासून काँग्रेसकडेच आहे. गेल्या चार निवडणुकांत सोनिया येथून विजयी होत आहेत. येथील प्रत्येक निवडणुकीत त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत.