नवी दिल्ली -कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सक्तवसुली संचालनालयापुढे (ईडी) हजर होण्यासाठी आणखी अवधी मागितला आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने सोनियांना समन्स बजावले.
त्यांना 8 जूनला हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, करोनाबाधा झाल्याने ईडीपुढे हजर होण्यास सोनियांना आणखी अवधी हवा आहे. ईडीने त्याच प्रकरणात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनाही 2 जूनला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राहुल यांनी परदेशी असल्याने पुढील तारीख मागितली.
आता ईडीने राहुल यांना 13 जूनला हजर होण्यास सांगितले आहे. सोनिया आणि राहुल यांना ईडीने समन्स बजावल्यावरून कॉंग्रेसने याआधीच तीव्र प्रतिक्रिया दिली. ते संपूर्ण प्रकरणच बनावट असल्याचे म्हणत कॉंग्रेसने भाजप आणि मोदी सरकारला लक्ष्य केले.