पिंपरी -भोसरी येथे भटक्या विमुक्त जाती जमातीची अनेक कुटुंबे पालात (झोपडीत) राहतात. येथेच एका कुटुंबात राहणाऱ्या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेले व त्यानेच चालबद्ध केलेले जगदंबेचा भक्त खरा, राजा शिवछत्रपती हे गीत प्रदर्शित झाले. या गाण्याला गायिका कार्तिकी गायकवाड-पिसे यांनी आवाज दिला आहे.
लखन गिरधारी वाईकर असे या युवकाचे नाव आहे. लखन मूळचा बारामती तालुक्यातील आहे. मात्र, 20-22 वर्षांपूर्वीच लखनचे आई-वडील भोसरीमध्ये स्थायिक झाले आहेत. लखनचे दोन्ही भाऊ अपघातात वारले. तर, आई-वडिलांसोबत तो भोसरी चक्रपाणीजवळ पालामध्ये राहतो. वडील भविष्य बघतात. तर, आई घरोघरी जाऊन गोधडी शिवण्याचे काम करते. त्यावर उदरनिर्वाह चालतो. भटके जीवन, अडचणींमुळे लखनचे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याला लिखाणाची आवड असल्याने त्याने कविता लिहिण्यास
सुरुवात केली.
लखन याने विविध धार्मिक, सामाजिक विषयांवर 50 हून अधिक कविता, 15 गाणी लिहिली आहेत. लखनची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. शिवरायांवर लिहिलेले गीत प्रदर्शित करण्यासाठी लखनकडे पैसे नव्हते. मात्र त्याने घरातील बकऱ्या विकून व हातउसने पैसे घेऊन या गाण्याची निर्मिती केली. त्याने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पराक्रमावर आधारित दोन गाणी लिहिली. त्यापैकी जगदंबेचा भक्त खरा, राजा शिवछत्रपती या गीताला गायिका कार्तिकी गायकवाड यांनी आवाज दिला आहे. त्यांनी त्याची परिस्थिती आणि तळमळ पाहून हे गीत गायिले आहे. हे गीत सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मी वयाच्या पाचव्या वर्षापासून कविता व गाणी लिहिण्यास सुरुवात केली आहे. आमची घरची परिस्थिती बेताची आहे. आई-वडील त्यांच्या कामातून जे काही पैसे कमवतील त्यामधून आमचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र, परिस्थिती कशीही असेल तर हिम्मत हारायची नाही ही शिकवण छत्रपती शिवरायांकडून मिळाली आहे. त्यामुळे आज त्यांच्या जीवनावर आधारित गाणे लिहिले आहे. गीत रेकॉर्ड करण्यासाठी हात उसने पैसे घेतले आहेत.
– लखन वाईकर, लेखक