पंढरपूर – स्पर्धेदरम्यान मैदानात धावत असताना कोसळून महाराष्ट्रातील धावपटूचा मृ्त्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे क्रिडा विश्वात शोककळा पसरली आहे. हरियाणातील रोहतक येथे स्पर्धा सुरु असताना ही घटना घडली आहे.
बंडू वाघमोडे, वय 21 असे धावपटूचे नाव असून तो सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रहिवासी होता. हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य मैदानी स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंडू वाघमोडे हा हरियाणात गेला होता. बंडू वाघमोडे हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता त्याला सैन्य दल किंवा पोलीस दलात जाण्याची इच्छा होती. मात्र त्याआधीच त्याने जगाचा निरोप घेतला.
बंडू हा स्पर्धेत धावत असताना अचानक मैदानात कोसळला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. बंडूचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. बंडूचे वडील मेंढपाळ करतात सोबतच बंडू सुद्धा वडीलांना हातभार लावत होता. मात्र त्याच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.