पिंपरी-चिंचवड : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाजपच्या गळाला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये आहे. निवडणुकीच्या तोंडावर शहरामध्ये शिवसेनेला पहिला धक्का बुधवारी (दि. 22) बसला.
शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे पती आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे व कामगार नेते अमोल कलाटे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी काही कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
मुंबई येथे आज, बुधवारी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी गजानन चिंचवडे यांनी चापेकर बंधू स्मारकाची प्रतिकृती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते.
गजानन चिंचवडे हे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थक असल्याचे मानले जाते. त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. मागील स्थायी समितीच्या सदस्य पदावर त्यांची वर्णी लागणार होती. मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांना स्थायी समिती सदस्यपद नाकारले. त्याच नाराजीतून त्यांचे पती गजानन चिंचवडे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.





