कांद्याला देशातील सर्वाधिक दर सोलापूरात

तब्बल 20 हजार रुपये प्रतिक्विंटलने विक्री

सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला देशातील सर्वाधिक दर मिळाला आहे. गुरुवारी झालेल्या लिलावामध्ये प्रतिक्विंटल 20 हजार रुपये या दराने कांदा विक्री झाला आहे. अक्कलकोट तालुक्‍यातील गौडगाव येथील शेतकरी शिवानंद फुलारी यांच्या 3 क्विंटल कांद्याला तब्बल 60 हजार रुपये एवढा दर मिळाला.

अवकाळी पावसामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि त्याचा सर्वात मोठा फटका कांदा पिकाला देखील बसला. त्यामुळे शेतातील काही प्रमाणात कांद्याचे पीक वाचले आणि सध्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. मागील चार-पाच दिवसांत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वसाधारणपणे सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. त्यातच गुरुवारी बाजार समितीच्या आवारात कांद्याचे लिलावामध्ये देशातील सर्वाधिक 20 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. हा दर फक्त तीन क्विंटल कांद्यासाठी असला तरीही सर्वसाधारण कांद्याचे दर देखील दिवसागणिक वाढत चालले आहेत.

दरम्यान, सकाळी कांदा लिलाव सुरू होण्यापूर्वी सोलापुरातील व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. कांद्याची चोरी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा आरोप करत कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी न करण्याचे धोरण स्वीकारले आणि तब्बल तीन तास लिलाव सुरू केले नाही. कांदा व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कांदा घेऊन आलेले शेतकरी संतप्त झाले आणि शेतकऱ्यांनी देखील आपला मोर्चा बाजार समितीच्या कार्यालयात वळवला.

सोलापूर शहराच्या परिसरातील ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात जमा होऊन प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळानंतर बाजार समितीचे सभापती आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यापाऱ्यांना बोलावून घेऊन मध्यस्थीची भूमिका घेतली आणि त्यानंतर बाजार समितीमधील लिलाव सुरू झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.