पुणे – “सामाजिक कार्यासाठी माझ्या आईने प्रेरणा दिली. यामध्ये वडिलांचाही सहभाग होता. “तू एक रुपया कमावला तर 30 पैसे सरकारला भर, 40 पैसे स्वत:साठी ठेव आणि 30 पैसे समाजासाठी ठेव” हे आईने सांगितलेले वाक्य नेहमी माझ्या मनात असते. दरवर्षी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 1,000 सायकल आणि संगणकांचे वाटप करतो.
यासह जम्मू-काश्मीरच्या एका गावातील 40 मुलींना दत्तक घेतले असून, त्यांचा खर्च फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. याशिवाय कुपवाडामधील एक शाळा फाउंडेशनद्वारे चालवण्यात येत आहे,’ अशी माहिती युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे “ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत शुक्रवारी युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांची मुलाखत घेण्यात आली. अभिनेत्री श्रुती मराठे यांनी बालन यांच्याशी संवाद साधला.
मुलाखतीदरम्यान त्यांनी आगामी काळातील प्रकल्प, कारकिर्दीचा आलेख, “मुळशी पॅटर्न’ चित्रपट निर्मिती याबद्दलचा प्रवास उलगडला. “मागील अनेक महिन्यांपासून जगावर करोनाचे संकट आहे. यंदा साध्या पद्धतीने, धार्मिक आणि परंपरेनुसार गणेशोत्सव होत आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरात आहेत. त्यांची मनःस्थिती देखील आपल्याला माहिती नाही.
नागरिकांना घरबसल्या मनोरंजनदेखील हवे. यामुळे घरी बसूनच सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, या अनुषंगाने काही सहकाऱ्यांशी चर्चा करून ऑनलाइन महोत्सव साजरा करण्याचे ठरले,’ असे देखील बालन यांनी यावेळी सांगितले.
डॉ. सलील कुलकर्णी यांच्या मैफिलीची आज पर्वणी
शनिवारी (28 ऑगस्ट) रोजी महोत्सवांतर्गत प्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांचे गायन रसिकांना ऐकायला मिळणार आहे. दुपारी साडेतीन वाजता मंडळाच्या ुुु.लहर्रीीरपसरीळ.लो या संकेतस्थळावर आणि “एबीपी माझा’ या वाहिनीवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.