अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांची माहिती

पुणे – करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक येथे दि. 26 ते 28 मार्चदरम्यान होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला.

करोनामुळे यंदा साहित्य संमेलन घेणार नसल्याचे महामंडळाने ठरवले होते. मात्र नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासून करोना रुग्णांची संख्या कमी झालेली संख्या आणि रसिकांची मागणी, उत्सुकता लक्षात घेता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नाशिकच्या “लोकहितवादी मंडळा’चे निमंत्रण स्वीकारुन 94 वे साहित्य संमेलन 26 ते 28 मार्च दरम्यान नाशिक येथे घेण्याचे जाहीर केले होते. मात्र मागील काही दिवसांपासून करोना बाधितांच्यात वाढ होत आहे.

त्यामुळे संमेलनाबाबतच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. तर लेखक आणि रसिकांमध्ये देखील संमेलन पुढे ढकलावे असा सूर होता. दै. “प्रभात’ने देखील याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. अखेरीस रविवारी झालेल्या बैठकीनंतर ठाले-पाटील यांनी संमेलन स्थगित केल्याचा निर्णय जाहीर केला.

यावेळी महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र साळुंखे आणि ग्रंथप्रदर्शन समितीचे सदस्य कुंडलिक अतकरे उपस्थित होते. यासंदर्भात महामंडळाचे उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि राज्यातील चार प्रमुख साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यासह संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार छगन भुजबळ आणि निमंत्रक संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्याशी चर्चा केल्याचे ठाले-पाटील यांनी सांगितले.

शुल्क परत घेण्याचा निर्णय प्रकाशक आणि विक्रेत्यांचा
संमेलनात पुस्तक प्रदर्शनासाठी गाळ्यांचे शुल्क (भाडे) दिलेल्यांना हे पैसे स्वागत मंडळाकडून परत घेता येणार आहेत. यासह संमेलन होईपर्यंत स्वागतमंडळाकडेच ठेवण्याचा पर्याय आहे. मात्र याचा निर्णय प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांचा असल्याचे ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यभरातून येणारे रसिक आणि संमेलनाध्यक्षांसह भारतभरातून येणाऱ्या निमंत्रित लेखक-कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तूर्त हे संमेलन रद्द करण्याऐवजी स्थगित केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यावर नाशिकच्या स्वागतमंडळाला साहित्य महामंडळाशी चर्चा करून हे संमेलन घेता येईल. मात्र स्थगित संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष आणि निमंत्रित साहित्यिक यात कोणताही बदल केला जाणार नाही. मे 2021 पूर्वी स्वागतमंडळाने घ्यावे, अशी महामंडळाची अपेक्षा आहे.
– प्रा. कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.