वाघळवाडी- सोमेश्वरनगर, मुरूम आणि निंबूत येथील 18 विकास सोसायट्यांमधील एकूण 762 शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी सन्मान योजनेचा फायदा झाला आहे. या शेतकऱ्यांची एकूण 5 कोटी 88 लाख रुपयांची कर्जाची रक्कम माफ झाली आहे.
सोमेश्वरनगर येथील मुख्य शाखा असलेल्या जिल्हा बॅंकेत या कर्जमाफीच्या पावत्यांचे वाटप शाखाधिकारी धनंजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, सोमेश्वरनगर जिल्हा बॅंकेच्या 14 सोसायटीच्या 481 शेतकऱ्यांना 3 कोटी 99 लाख 73 हजार, मुरूम जिल्हा बॅंकेच्या 2 सोसायटीच्या 147 शेतकऱ्यांना 1 कोटी तर निंबूत येथील 2 सोसायट्यांमधील 134 शेतकऱ्यांना 88 लाख 86 हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यामध्ये मध्यम मुदत प्रकारातील कर्जमाफी झाली नसून थकीत असलेले पीक कर्ज माफ करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला आहे अशा शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रे घेऊन जिल्हा बॅंकांशी संपर्क साधावा असे आवाहन बॅंक मॅनेजर धनंजय गायकवाड यांनी केले आहे.