नवी दिल्ली – वैयक्तिक आयुष्याबद्दल माध्यमांनी टीका केल्यामुळे नाराज मिस जपान पुरस्कार जिंकणार् या सौंदर्यवतीने आपला पुरस्कार परत केला आहे. जपानमधील एका मासिकाने या सौंदर्यवतीचे आणि एका विवाहित पुरुषाबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मिस जपान पुरस्कार परत करण्याचा निर्णय या सौंदर्यवतीने घेतला असल्याचे सौंदर्य स्पर्धेच्या आयोजकांनी म्हटले आहे.
कॅरोलिना शिनो असे या स्पर्धेतील विजेत्या युवतीचे नाव आहे. गेल्या महिन्यात २२ जानेवारीला तिने मिस जपान स्पर्धा जिंकली होती. मात्र ती मूळ जपानी वंशाची असल्याबद्दल शंका व्यक्त करणारा एक लेख एका मासिकात प्रसिद्ध झाला. तसेच तिचे एका विवाहित डॉक्टरबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोपही या लेखामध्ये केला गेला होता.
कॅरोलिनाने प्रथम या प्रेम संबंधांची कबुली दिली होती. मात्र नंतर हा डॉक्टर विवाहित असल्याचे आपल्याला माहिती नव्हते असेही म्हटले होते. याशिवाय तिचा जन्म युक्रेनमध्ये झालेला असल्यामुळे ती मूळ जपानी वंशीय असल्याबद्दल शंका उपस्थित केली गेली होती.
मात्र यामुळे तिच्यावरच टीका झाली. यामुळे नाराज झालेल्या कॅरोलिना शिनो हिने संबंधित डॉक्टरच्या पत्नीची माफी मागितली आणि मिस जपान पुरस्कार परत केला. तसेच मॉडेलिंग एजन्सीचा राजीनामा दिला.