…तर करोनाचे बळी कमी होऊ शकतात

  • लवकर निदान होणे आवश्‍यक : लक्षणे दिसताच तपासणी करा
  • सप्टेंबर महिन्यात दर 41 मिनिटांला एक मृत्यू

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर मृत्यूही झपाट्याने वाढत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दर तासाला एक मृत्यू होत होता. परंतु आता करोना दर 41 मिनिटाला एक बळी घेत आहे. तर सप्टेंबर महिन्यात दिवसाला सरासरी 35 मृत्यूंची नोंद झाली आहे.

शहरातील रुग्णांचा मृत्यूदर दोन टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे, परंतु शहराबाहेरील आणि विशेषत: ग्रामीण भागातून शहरात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचा मृत्यूदर 6.40 टक्‍क्‍यांपर्यंत (13 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंतच्या आकड्यांनुसार) जाऊन पोहोचला आहे. याला प्रशासनाच्या चुकांसोबतच नागरिकांची मानसिकताही कारणीभूत ठरत आहे. अनेक रुग्ण रुग्णालयात उशिरा दाखल होतात. त्यामुळे करोनाचे निदान लवकर होत नाही. परिणामी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

रुग्णालयामध्ये उशिरा दाखल होणाऱ्यांमध्ये शहराबाहेरील रुग्णांचा समावेश जास्त आहे. जास्त त्रास झाला किंवा ग्रामीण भागामध्ये सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तर शहराकडे धाव घेतात. शेवटच्या क्षणी रुग्णालयात दाखल झाल्यामुळे डॉक्‍टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शहराबाहेरील आतापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी सुमारे 75 टक्के रुग्णांचे मृत्यू हे रुग्णालयात उशिरा दाखल केल्यामुळे झाले आहेत.

काही प्रमाणात लक्षणे आढळल्यानंतरही काही रुग्ण करोनाच्या धास्तीमुळे उपचारासाठी पुढे येत नाहीत. तर अनेक रुग्ण चाचणी लवकर करत नाहीत. त्यामुळे लवकर निदान होत नाही. रुग्णालयात दाखल करण्यास उशीर झाल्यामुळे रुग्णास वाचविण्यात अडचण येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मृत्यू रोखण्यासाठी लवकर निदान होणे व तातडीने उपचार सुरू होणे आवश्‍यक आहे. लक्षणे दिसताक्षणी तातडीने करोना चाचणी केली तर संभाव्य धोका कमी होतो. केवळ करोनाच्या धास्तीमुळे घरीच बसणे जीवघेणे ठरू शकते. प्राथमिक चाचणीअंती डॉक्‍टरांना किमान पाच ते सहा दिवस उपचारासाठी मिळाले तर मृत्यू रोखता येऊ शकतात.

ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज
ग्रामीण भागातून तसेच शहराबाहेरुन शहरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा मृत्यूदर प्रचंड वाढत आहे. हा मृत्यूदर राज्याच्या आणि देशाच्या मृत्यूदरापेक्षा देखील अधिक आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रविवारी सायंकाळपर्यंत 1164 शहराबाहेरील रुग्ण उपचार घेत होते. तर आतापर्यंत 3091 शहराबाहेरील रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण शहराबाहेरील 4546 रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यापैकी 291 रुग्णांचा करोनाने बळी घेतला आहे. मृत्यूची टक्‍केवारी 6.40 टक्‍क्‍यांइतकी आहे. विशेषत: खेड, राजगुरुनगर, जुन्नर, शिरुर या भागामध्ये अजूनही अत्यावश्‍यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने येथील मृत्यूदर वाढत आहे. तब्येत खूपच ढासळल्यानंतर येथील रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल होत आहेत.

प्रशासनाचा हलगर्जीपणाही कारणीभूत
शहरामधील वाढत्या मृत्यूला नागरिकांची चाचणीसाठी असमर्थता तसेच उपचारासाठी हलगर्जीपणा कारणीभूत आहेच. तर दुसरीकडे प्रशासनाची दिंरगाईही तितकीच कारणीभूत आहे. वेळेमध्ये चाचणी अहवाल न देणे, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष करणे या गोष्टी कारणीभूत आहेत. करोना चाचणीचा अहवाल देण्यासाठी तब्बल सात ते आठ दिवस घेतले जात आहेत. तोपर्यंत त्या रुग्णांची प्रकृती खालावते.

बहुतांश मृत्यू हे रुग्ण रुग्णालयात उशिरा दाखल केल्यामुळे होतात. शहरातील मृत्यूदर कमी करण्यासाठी ऑक्‍सिजनचे बेड वाढविले आहेत. नागरिकांनी आजार अंगावर काढू नये. लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर कोविड सेंटर किंवा कोविड समर्पित रुग्णालयात भरती व्हावे.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी.

Leave A Reply

Your email address will not be published.