येत्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
प्रवेश प्रक्रिया व नियुक्त्या संरक्षित करण्याचीही मागणी
पुणे – मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी, सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती हटवावी यासाठी मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. येत्या गुरुवारी (दि. 17) सकाळी 11 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोशल डिस्टन्स पाळून ही निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
राजेंद्र कुंजीर, तुषार काकडे, धनंजय जाधव, सचिन आडेकर, हनुमंत मोटे, रघुनाथ चित्रेपाटील, अमर पवार, बाळासाहेब अमराळे, युवराज दिसले, श्रुतिका पाडळे, मीना जाधव उपस्थित होते.
‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सुपूर्त करताना जो स्थगिती आदेश दिला आहे, त्यावर राज्य सरकारने घटना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सदरची स्थगिती हटवण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर बाब अवलंबित करावी,’ अशी प्रमुख मागणी कोंढरे यांनी केली.