नवी दिल्ली – गुजरातमध्ये ‘इंडिया’ (india aghadi) या विरोधी पक्षांच्या आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे लढावे. तसे झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत (loksabha election 2024) गुजरातमधील अनेक जागा भाजप (bjp) गमावेल, असे भाकित आपचे नेते संजय सिंह (Sanjay singh) यांनी केले.
गुजरातमधील आपच्या (AAP) कार्यकर्त्यांचा मेळावा अहमदाबादमध्ये झाला. त्यामध्ये बोलताना सिंह यांनी “इंडिया’ने एकजुटीने लढण्याची गरज अधोरेखित केली. एकत्रित लढल्यास भाजपपुढे मोठे आव्हान उभे करता येईल, असे राजकीय गणित त्यांनी मांडले.
गुजरातमध्ये लोकसभेच्या एकूण 26 जागा आहेत. त्या सर्व जागा भाजपने मागील निवडणुकीत (वर्ष 2019) जिंकल्या होत्या. त्या राज्यात भाजप आणि कॉंग्रेस (Congress) हे पक्षच प्रदीर्घ काळ एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी ठरले. मात्र, मागील काही काळापासून आपनेही राजकीय बस्तान बसवले आहे. त्यामुळे तो पक्ष कॉंग्रेसशी हातमिळवणी करून आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी अनुकूलता दर्शवत आहे. कॉंग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष इंडियाचे घटक आहेत.