मुंबई – सध्या झी मराठीवरील लोकप्रिय ठरत असलेली ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेने अल्पावधीमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेची भूरळ खासदार स्मृती इराणी यांनाही पडली आहे. त्यामुळेच या मालिकेतील एका भागाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
या मालिकेमध्ये सासू-सूनेच्या आदर्श जोडीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानने सूनेची भूमिका साकारली असून अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सासूची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे सासू-सूनेमधील गोड नात्यावर भाष्य करणाऱ्या या मालिकेतील एक भाग सध्या चांगलाच गाजताना पाहायला मिळत आहे. या भागामध्ये आईने आपल्या घरातल्यांसाठी केलेला त्याग, काळजी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळेच स्मृती इराणी यांनी हा भाग सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनेक वेळा आपण आईला रागात किंवा मस्करीमध्ये बोलून जातो की, ‘तू पूर्ण दिवस घरात बसून काय करतेस?’ मात्र सतत घरात राहणारी आई आपल्या मुलांसाठी, घरातल्यांसाठी काय-काय करते याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. तरीदेखील आपला कायम प्रश्न असतो की आई तू घरात काय करतेस ?, या घटनेवर आधारित एक भाग प्रसारित करण्यात आला. हा भाग पाहिल्यानंतर स्मृती इराणी यांना त्यांच्या लोकप्रिय ‘तुलसी’ या मालिकेची आठवण आली.
दरम्यान, ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतून अनोख्या आणि प्रेमळ नात्यांचे बंधन उत्तमरित्या उलगडण्यात आले आहेत. सासू-सूनेभोवती फिरणाऱ्या या मालिकेत आपल्या सासूला कायम समजून घेणारी, तिचं मन वाचणारी सून प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.