कोपरगाव – तालुक्यातील गौतमनगर येथील गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि. व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि.ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कंपनीचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस प्रारंभ झाला. काळे म्हणाले, माजी खासदार स्व. शंकररावजी काळे यांनी सहकारी साखर कारखान्याबरोबरच ज्या काही संस्था स्थापन केल्या, त्या संस्थांच्या सभासदांचे हित जोपासले आहे. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांचे हिताचाच आजपर्यंत विचार केला आहे. संस्थेने ऊस वाहतूक ट्रकधारक, ऊस तोडणीमजूर व कंत्राटदारांचे सर्व प्रकारचे देणी वेळेवर दिली आहेत.
आगामी गळीत हंगाम खूपच अडचणीचा असून, जवळपास पन्नास टक्के ऊस हा कार्यक्षेत्राबाहेरून आणावा लागणार आहे. त्यादृष्टीने ट्रकधारक सभासदांनी तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक सुभाष आभाळे यांनी केले. सूत्रसंचालन जनरल मॅनेजर सोपानराव डांगे यांनी केले, तर आभार संचालक विजय जाधव यांनी मानले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव आहेर, बाळासाहेब बारहाते, सुधाकर रोहोम, अशोकराव तिरसे, सूर्यभान कोळपे, सचिन चांदगुडे, अशोक मुरलीधर काळे, कारखान्याचे सचिव सुनील कोल्हे, कार्यालयीन अधीक्षक बाबा सय्यद, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि.चे कार्यकारी संचालक सुभाष आभाळे, गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे ज्ञानेश्वर हाळनोर, सर्व संचालक मंडळासह सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.