पिंपरी – पदपथावर हातगाडी लावणाऱ्या महिला फेरीवालीला नगरसेवकाच्या भावाने शिवीगाळ केल्याची फिर्याद महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अश्विनी राजेश बांगर (वय 42, प्रेमसागर सोसायटी, एल्प्रो चौक, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल शिंदे (रा. चिंचवड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. बांगर यांची पराठा विक्री करण्याची हातगाडी आहे. शुक्रवारी (दि. 13) त्यांनी आपली हातगाडी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या समोरील बाजूस हिंदवी चौपाटीवर लावली. तेथे आलेल्या एकाने अमोल शिंदे यांना फोन लावून दिला. तुम्हाला तिथे हातगाडी लावण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल अमोद शिंदे याने फोनवरून बांगर यांना विचारला.
मला अडविणारे तुम्ही कोण, अशी विचारणा केली असता काही वेळेतच अमोल तिथे आला आणि महिला फेरीवालीला शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करून आल्यानंतर नगरसेवक शितल शिंदे यांनीही आपल्याला दमदाटी केल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे. तसेच त्यांनी याबाबतचा व्हिडिओ देखील दाखविला. यापूर्वी एल्प्रो चौकातील फेरीवाल्यांना हटविताना एका आईस्क्रीम विक्रेत्याने नगरसेवक शीतल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
याबाबत बोलताना नगरसेवक शीतल शिंदे म्हणाले, “”हिंदवी चौपाटीवरील फेरीवाल्यांचा महापालिकेशी करार करून दिला आहे. यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळत आहे. आपण हे केल्यामुळे काही जणांचे हप्ते बंद झाल्याने ते महिलांना पुढे करून असे काही उद्योग करीत आहेत. संबंधित महिलेने ही जागा काय तुझ्या बापाची आहे का, असे म्हणत आपला बाप काढला. कारवाईसाठी आलेल्या महापालिकेच्या पथकाला संबंधित महिलेने अटकाव केल्यामुळे आपण तिथे आलो होतो.”