ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला सध्या धक्कादायक बातम्यांना सामोरे जावे लागत आहे. महान यष्टीरक्षक रॉडनी मार्श व महान लेग स्पीन गोलंदाज शेन वॉर्न यांच्या धक्कादायक मृत्यूनंतर आता अष्टपैलू अँड्य्रू सायमंड्स याच्या चटका लावणाऱ्या मृत्यूने दु:खच्या खाईत लोटले आहे.
वेस्ट इंडिजची जागतिक क्रिकेटवरील मक्तेदारी संपुष्टात आणून पुढील तब्बल तीन दशके ज्या ऑस्ट्रेलियाने आपली सत्ता निर्माण केली त्या प्रत्येक कालखंडात दिग्गज मानल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये एक नाव सायमंड्सचेही घ्यावेच लागेल. या खेळाडूकडे अफाट गुणवत्ता होती. तो संघाची अवस्था 5 बाद 30 असताना खेळपट्टीवर यायचा व पाहता पाहता संघाला द्विशतकी किंवा त्रिशतकी धावा उभारून द्यायचा. त्याला कपिल देव, इयान बोथम, सर गारफिल्ड सोबर्ससारखे महान अष्टपैलू कोणी म्हटले नाही, पण जर क्रमवारीच तयार करायची असेल तर सायमंड्सचे नाव पहिल्या पाच खेळाडूंत निश्चितच घ्यावे लागेल, पण म्हणतात ना गुणवत्तेला शिस्तीचे कोंदण असेल तरच ती बहरते अन्यथा ती बदनाम होते.
असेच काहीसे सायमंड्सबाबतही घडले. संघाला कोणत्याही बिकट परिस्थितीत एकहाती विजय मिळवून देणारा हा खेळाडू जितका मैदानावरील त्याच्या कामगिरीने गाजला तितकाच मैदानाबाहेरील वर्तवणुकीने बदनामही झाला. मग ते मेलबर्नच्या किंवा लंडनच्या बारमध्ये मद्यपान करून घातलेला धिंगाणा असो किंवा भारताच्या हरभजनसिंगबरोबर घडलेले मंकी गेट प्रकरण असो. सायमंड्सला आपल्या भावनांवर तसेच संतापावर नियंत्रण राखणे कधीही जमले नाही.
जागतिक क्रिकेटमध्ये नैसर्गिक क्रिकेटपटू हा शब्द केवळ वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंबाबतच बोलले जाते; पण सायमंड्स देखील याच पठडीतील होता. रॉय किंवा सायमो या टोपण नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू अवघ्या 46 व्या वर्षी कार अपघातात मृत्यू पावतो हे पचायला थोडे जड जाते. बेफिकीर, बेदरकार ही विशेषणे त्याच्याबाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरतात.
क्रिकेटच्या तीनही प्रकारांत मिळून जवळपास 300 सामने त्याने खेळले व 6 हजारांपेक्षा जास्त धावा व 200 पेक्षाही जास्त बळी त्याने मिळवले. ही आकडेवारी त्याला महान अष्टपैलू ठरवण्यासाठी पुरेशी नाही, असे काही इंग्लिश समीक्षक निश्चितच म्हणतील; पण ही कामगिरी त्याने कोणत्या परिस्थितीत केली ती पाहिली तर त्याच्या महानतेची साक्ष निश्चितच पटते. कधी संयमी फलंदाज, तर कधी आक्रमक फटकेबाज तसेच कधी मध्यमगती गोलंदाज तर कधी ऑफ स्पीन गोलंदाज अशा कितीतरी भूमिका तो जगला व यशस्वीही ठरला.
रक्ताने आफ्रिकन-कॅरेबियन वंशाचा असला तरीही तो मनाने ऑस्ट्रेलियन होता. विजय हा विजय असतो तो कसा मिळाला किंवा मिळवला ते महत्त्वाचे नसते याच ऑस्ट्रेलियन विचारांवर तो वाढला. मागील सामन्यात काय केले ते न पाहता वर्तमानात काय करता येईल, त्यानुसार कामगिरी करणारा मेहनती क्रिकेटपटू होता. पूर्वपुण्याईवर महिनोंमहिने संघातील जागा उबवत असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंसारखा निश्चितच नव्हता. त्याची कामगिरी व कारकीर्द वादग्रस्त ठरली तरीही त्याच्या मृत्यूच्या बातमीने क्रिकेटप्रेमी निश्चितच गहिवरला असेल यात शंका नाही.