सातारा – भाद्रपद शुक्ल सप्तमीच्या निमित्ताने ज्येष्ठा गौरीचे स्वागत झाल्यानंतर शुक्रवारी पीठाच्या सोळा दिव्यांद्वारे महालक्ष्मीची आरती आणि नैवेद्यासाठी 56 प्रकारचे भोग तयार करण्यामध्ये गृहिणींची धांदल उडाली. गौरी आवाहनानंतर त्यांचे विधिवत पूजन व नैवैद्य सोहळा जिल्ह्यातील घरोघरी थाटामाटात पार पडला.
शुक्लपक्षाच्या सहाव्या दिवशी घरोघरी गौरीचे आगमन होते. याला ज्येष्ठा गौरी आवाहन म्हणतात. तीन दिवस गौरी पूजनाला विशेष महत्त्व आहे. आवाहनाच्या दिवशी महालक्ष्मीचे आगमन झाल्यावर महालक्ष्मीचा साजशृंगार करून त्यांची स्थापना केली जाते.
महालक्ष्मीला अंबाडीची, शेपूची आणि ज्वारीच्या भाकरीचे नैवेद्य दाखवला जातो. सप्तमीच्या दिवशी महालक्ष्मीच्या 16 दिव्यांद्वारे आरतीला आणि 56 भोग तयार करण्याच्या प्रक्रियेला विशेष महत्त्व असते. गौरी पूजनाच्या वेळी महालक्ष्मीसाठी पंचपक्वान्न केले जाते. महालक्ष्मीला पाहण्यासाठी घरी पाहुणे, आप्तस्वकीय येतात. याच दिवशी महिला हळदी कुंकवासाठी एकमेकांच्या घरी जातात. हळदीकुंकवाच्या निमित्ताने साताऱ्यामध्ये महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर लगबग दिसून आली.
फळ व मिठाई बाजार तेजीत
गौराईच्या कौतुकाच्या निमित्ताने फळबाजार आणि मिठाई बाजारामध्ये मोठी उलाढाल झाली. शनिवारी गौरी विसर्जन होत आहे. विसर्जनाच्या दिवशी भाजी पोळी, दहीभात आणि कानोल्याचा म्हणजे करंजीचा नैवेद्य दाखवला जातो. विसर्जनाच्या वेळी महालक्ष्मीला काही खायचे पदार्थ शिदोरी म्हणून देतात. महालक्ष्मीची आरती करून पुढील वर्षी येण्याचे निमंत्रण दिले जाते आणि निरोप दिला जातो. उद्या शनिवारी गौराईंचे विसर्जन होत आहे. त्याची तयारी घरोघरी केली जात आहे.