अमलापुरम (एपी) – आंध्र प्रदेशातील आमदार पी वेंकट सतीशकुमार यांचे सहा नातेवाईक अमेरिकेतील टेक्सास प्रांतात झालेल्या अपघातात ठार झाले. हे सर्व जण आंध्रप्रदेशातील कोनासीमा जिल्ह्यातील अमलापुरम गावचे रहिवासी आहेत.
टेक्सासमधील क्लेबर्न शहरातील फार्म ते मार्केट रोडवर हायवे क्रमांक ६७ वर त्यांच्या गाडीची ट्रकशी समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. कारमध्ये सात लोक प्रवास करत होते.
कारमधील एकमेव बचावलेला, लोकेश याला विमानाने रुग्णालयात नेण्यात आले आहे जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत, परंतु तो गंभीर असल्याचे सांगितले जात आहे, अशी माहिती आमदारांनी दिली.
या दुर्घटनेत ट्रकची चूक असल्याचे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी म्हटले आहे. मृतांमध्ये आमदारांचे काका, काकू, त्यांची मुलगी, दोन नातवंडे आणि अन्य एका नातेवाईकाचा समावेश आहे.
जॉर्जिया राज्यातील अटलांटा येथून ख्रिसमसच्या सुट्टीसाठी हा ग्रुप टेक्सास येथील त्यांचा नातेवाईक विशालच्या घरी गेला होता. तेथून त्यांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली आणि ते परतत असताना ही दुर्घटना घडली, असे आमदार वेंकट सतीश कुमार यांनी सांगितले.