मास्को – रशियातील विरोधी नेते ऍलेक्सी नवालनी यांना झालेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण रशियात डझनभर शहरांमध्ये प्रचंड रॅली काढण्यात आल्या. पोलिसांनी या रॅलीतील दीड हजारपेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
ऍलेक्सी नवालनी यांनी गेल्या तीन आठवड्यांपूर्वीपासून तुरुंगातच उपोषण सुरू केले आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना दुसऱ्या तुरुंगातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवालनी यांच्या प्रकृतीअस्वास्थ्यते बाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही चिंता व्यक्त केली जात आहे. नवालनी यांची तुरुंगातून सुटका करण्यात यावी आणि त्यांच्यावर योग्य उपचार केले जावेत, या मागण्यांसाठी आज अनेक ठिकाणी मोर्चे काढले गेले.
विरोधी नेत्यांनी अनेक ठिकाणी धरणे आंदोलन केले तर सर्वात मोठा मोर्चा राजधानी मॉस्को मध्ये काढण्यात आला. त्या मोर्चादरम्यान करोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दीड हजारपेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.
सेंट पीटर्सबर्ग येथे सर्वाधिक आठशे जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथे पोलिसांना जमाव नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमारही करावा लागला. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये नवालनी यांच्या माध्यम सचिव किरा यारमिश यांचाही समावेश आहे.
जर्मनी वरून रशियाला परतल्यानंतर नवालनी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी जे मोर्चे काढले गेले होते, त्यापेक्षा आजचे मोर्चे कमी संख्येचे होते. जानेवारीच्या कडक हिवाळ्यामध्ये मॉस्कोमध्ये नवालनी यांच्या समर्थनासाठी काढलेल्या मोर्च्यामध्ये 11 हजार जण सहभागी झाले होते.