पुणे: लॉकडाऊनच्या काळात खोटी माहिती देऊन डिजिट्ल पास मिळविणे सहा जणांना महागात पडले आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 177 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. नागरिकांनी खोटी माहिती देऊन पास मिळवू नयेत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
शहरात 144 अन्वये संचार आणि जमाव बंदी सुरू आहे. जीवनावश्यक वस्तुंचे वाहतुकीस आणि महत्त्वाचे कारणासाठी असुविधा येऊ नये, यासाठी पोलिसांकडून ऑनलाईन डिजिटल पास देण्यात येत आहेत. त्यावर सेवा सेलच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण आणि कर्मचारी अहोरात्र काम करत आहे. याबाबत व्हॉट्सअप, फेसबुकवरून जनजागृती करण्यात आलेली आहे.
28 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत 3 लाख 18 हजार नागरिकांनी डिजिटल पाससाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी छाननी करून 1 लाख 63 हजार लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यापैकी 1 लाख 7 हजार अर्ज सुट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेतील आहेत. तर, 47 हजार इतर लोकांना परवानगी देण्यात आलेली असून, यामध्ये वैद्यकीय कारणास्तव केलेल्या अर्जांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामध्ये कॅन्सर रुग्ण 1 हजार 568, अतिदक्षता विभाग रुग्ण 1 हजार 168, सर्जरी रुग्ण 1 हजार 43, डायलिसीस रुग्ण 343, डायबेटीक रुग्ण 418, प्रसुतीसाठी 2 हजार 691 आणि लहान मुलांवरील उपचारासाठी 619 परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.
काही लोकांनी आधारकार्डबाबत खोटी माहिती देऊन पास मिळविल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संशयास्पद माहितीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना दिले. त्यानुसार सहा जणांनी खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आले असून, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.