सातारा -सातारा शहरात करोनाबाधित रुग्ण सापडल्याने कंटेनमेंट झोनच्या कडक लॉकडाऊनचा अनुभव गुरुवारी साताऱ्याने घेतला. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व सेवा स्थगित झाल्याने सातारा शहरात सन्नाटा होता.
या कडक लॉकडाऊनची पूर्वकल्पना येईपर्यंत तो लागू झाल्याने गुरूवारी नागरिकांचे हाल झाले. शहराची दूध व सिलिंडर सेवा सुरू होती. सदरबझार परिसरात करोनाबाधित महिला कर्मचारी आढळल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रात्री उशिरा सातारा शहर व परिसरातील सर्व गावांमध्ये पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले . त्यामुळे पोलिसांनी सातारा शहराचे सर्व चौकांत व एण्ट्री पॉंईटला बंदोबस्त वाढवला. किराणा माल व औषध सुविधासुध्दा बंद राहिल्या. या लॉकडाऊनमध्ये फक्त दूध व औषध घरपोच देम्याची व्यवस्ता करण्यात आली आहे. दूध वितरकांची यादी प्रशासनाने सायंकाळी प्रसिद्ध केली आहे. परळीतून साताऱ्यात येणारी दूध सेवा बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गे सुरू होती. कडक शिस्तीचा लॉकडाऊन दिसून आला.
राजवाडा, स्टॅंन्ड परिसर, मोती चौक पोवई नाका, राधिका चौक या भागात पोलिसांव्यतिरिक्त रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून गोडोली, बांधकाम भवन, कोर्ट परिसर, मुथा चौक ते उत्तेकर नगर, रिमांड होम, देशमुख कॉलनी, कोर्ट स्टाफ क्वार्टर्स, अजिंक्य चौक या सर्व परिसरात पालिकेच्या आरोग्य विभागाची सात पथके नागरिकांचे तापमान व शारीरिक तपासणीच्या कीटसह रवाना करण्यात आले होते. तब्बल 675 कुटुंबांची तपासणी करण्यात आली .पालिका कर्मचाऱ्यांनासुध्दा सॅनिटायझर व मास्क देण्यात आले होते. वॉर्ड क्रं तीन ते सहा म्हणजे भूविकास बॅंक ते गोडोली चौक या भागात जंतुनाशक फवारणी हाती घेण्यात आली आहे.