आता चिंचवड गावातही “करोना’चा शिरकाव
पिंपरी – पुण्याच्या सील भागातील एक व्यक्ती चिंचवडमधील माणिक कॉलनीत राहण्यास आली. ती व्यक्ती करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने चिंचवडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये “करोना’चे रुग्ण आढळत असताना चिंचवड मात्र “करोनामुक्त’ होते. परंतु आता चिंचवडमध्येही “करोना’चा शिरकाव झाला आहे.
महापालिकेच्या आठपैकी सात क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये करोना बाधित आढळून आले होते. चिंचवडचा समावेश असलेल्या “ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एकही रुग्ण नव्हता. करोनाबाधित रुग्ण पुण्यातील गंजपेठचे रहिवासी आहेत. गंजपेठचा भाग सील असल्याने व त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या जावयाने त्यांना चिंचवडमध्ये आणून आपल्या वडीलांच्या घरी मोकळ्या खोलीत ठेवले. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील त्या व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने खासगी रुग्णालयात नेले. मात्र त्यांनी रुग्णास वायसीएम रुग्णालयात पाठविले. तिथे केलेल्या तपासणीत करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामुळे या भागात सर्व्हेक्षण आणि फवारणी सुरू केली आहे. ती इमारत सील करण्यात आली आहे. करोना बाधित व्यक्ती पुण्यातील असली तरी त्यांचे वास्तव्य काही दिवसांपासून चिंचवडमध्ये असल्याने भीतीचे वातावरण आहे.
लोकप्रतिनिधीकडून रुग्णाची ओळख उघड
करोना बाधिताचे नाव किंवा ओळख पटेल असे कोणतेही कृत्य करू नये, अशा शासनाच्या सूचना आहेत. मात्र तरीदेखील एका लोकप्रतिनिधीने माणिक कॉलनीमधील करोना बाधित व्यक्तीच्या नातेवाईकाचे ओळख उघड होईल असा मेसेज सोशल मीडियाद्वारे पाठविला. मात्र चूक लक्षात येताच, तो मेसेज डिलीट केला. परंतु तोपर्यंत अनेकांनी तो मेसेज पुढे फॉरवर्ड करून पसविला होता.