Sidharth Malhotra: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या (Sidharth Malhotra) आगामी ‘योद्धा’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 8 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार होता. अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘मेरी क्रिसमस’ च्या सिनेमासोबत ‘योद्धा’ ची टक्कर होणार होती. मात्र आता हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राने पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत रिलीज डेट पुढे ढकलली असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. सिद्धार्थने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो सैनिकाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थ मल्होत्राने ‘योद्धा’चं नवं पोस्टर शेअर करत लिहिले की, “अॅक्शन आणि रोमांचक धमाका करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तुम्ही देखील सीट बेल्ट लावा, योद्धा 15 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित येणार आहे.” त्यामुळे आता प्रेक्षकांना सिद्धार्थच्या ‘योद्धा’ चित्रपटासाठी आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, ‘योद्धा’ या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिशा पटानी (Disha Patani) आणि राशी खन्ना (Raashii Khanna) यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.