पुणे – कॅनडाचा बनावट व्हिसा आणि विमान तिकीट काढल्याप्रकरणी एका संगणक अभियंत्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. संबंधीत अभियंता लॉकडाऊममुळे 2019 मध्ये बेरोजगार झाला होता.
तेव्हा पासून त्याच्या घरचे त्याला नोकरीसाठी तगादा लावून होते. आई-वडिलांच्या खुशीसाठी त्याने कॅनडाला नोकरीसाठी जात असल्याचा बहाणा केला होता. मात्र विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांच्या हाती तो लागला.
असीम रविंद्र गोगटे (30,रा.औंध) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचे बीटेक पर्यंत शिक्षण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गोगटे हा एका संगणक कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. लॉक डाऊनमध्ये 2019 ला कंपनीने त्याला कामावरुन कमी केले होते.
त्यानंतर त्याला कोठेही नोकरीची संधी मिळाली नाही. मागील दिड-दोन वर्षे तो घरीच बसूण होता. दरम्यान त्याच्या आई-वडिलांनी कामधंदे करण्यासाठी त्याच्यामागे तगादा लावला होता.
आई-वडिलांच्या खुशीसाठी त्याने घरीच संगणकावर कॅनडाचा बनावट व्हिसा आणि विमानाचे तिकीट तयार केले. यानंतर घरच्यांना कॅनडात नोकरी लागल्याचे सांगितले.
दरम्यान तो आई-वडिलांना घेऊन विमानतळावर आला. तेथे आई-वडिलांनी निरोप दिला. मात्र एंट्री गेटमधून आत गेल्यावर तो तेथेच काही वेळ थांबून पुन्हा माघारी निघण्यासाठी गेट पाशी आला. तेथील जवानांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याची कागदपत्रे तपासली.
तेव्हा त्यांना व्हिसा आणि तिकीट बनावट असल्याचे आढळले. त्यांनी गोगटेला ताब्यात घेऊन विमानतळ पोलिसांकडे सोपवले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाठक करत आहेत.