करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन कंपनीने आपल्या नवीन ऍक्शन फिल्म फ्रॅन्चायजीची घोषणा केली आहे. या सिनेमाचे नाव “योद्धा’ असेल आणि त्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा लीड रोलमध्ये असणार आहे. “योद्धा’चे एक मोशन पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले आहे. त्यामध्ये एक प्रवासी विमान हवेतून जमिनीवर कोसळताना दिसत आहे. हे विमान पेटलेले आहे.
याच विमानामध्ये अंधारात सिद्धार्थ मल्होत्रा हातात बंदूक घेऊन कोणावर तरी नेम रोखून उभा असलेलाही दिसतो आहे. सिद्धार्थचा हा “योद्धा’ पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमातील हिरोईन आणि व्हिलनची घोषणा नंतर केली जाणार आहे, असे करण जोहरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेले आहे.
मात्र, राशी खन्ना आणि दिशा पटणी या लीड रोलमध्ये दिसतील असे समजले आहे. “योद्धा’ हा एका विमानाच्या अपहरणाच्या कथेवर आधारलेला असणार आहे. धर्मा प्रॉडक्शनचा “शेरशहा’ खूपच यशस्वी झाला आहे. कारगिल हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावरील हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. त्या सिनेमातूनच सिद्धार्थ मल्होत्रा हिरो म्हणून प्रस्थापित झाला आहे.