बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये आपल्या अफलातून नृत्य आणि दिग्दर्शनातून सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता, डान्सर आणि दिग्दर्शक प्रभुदेवा याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता प्रभुदेवा कॅमेऱ्याच्या पाठीमागे नव्हे, तर कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना दिसणार आहे.
दिग्दर्शक आशिष दुबे यांच्या आगामी “जर्नी’ चित्रपटामध्ये प्रभुदेवा पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची झलक दाखविणार आहे. प्रभुदेवा दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रामध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग आग्रा आणि युरोपमध्ये करण्यात येणार आहे.
दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती अंजुम रिझवी आणि आशिष दुबे करत आहेत. अंजुम रिझवी फिल्म कंपनी, मॅड फिल्म एंटरटेन्मेंट आणि स्टॅग फिल्म्स एंटरटेन्मेंट यांच्या बॅनरखाली “जर्नी’ ही एक अतिशय भावनिक प्रेमकथा तयार केली जाणार आहे.