श्वेता त्रिपाठीची तुलना अलीकडेच आयुष्मान खुरानाबरोबर केली गेली. त्यामुळे श्वेता भलतीच आनंदित झाली आहे. “आयुष्मानशी तुलना होणे, ही बाब निश्चितच आनंददायक आहे. आपण सध्या अशा काळामध्ये वावरतो आहोत, की जिथे निखळ स्पर्धा अगदी आवश्यकच मानली जाते. विशेषतः आपल्याच सहकाऱ्याबरोबर अशी स्पर्धा असेल, तर त्यातून प्रेरणाही मिळू शकते.
आपले सहकारीच आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकतात.’ असे ती म्हणाली. आयुष्मानने एका अख्ख्या पिढीच्या कलाकारांना आपल्या आवडीच्या सिनेमांमध्ये काम करण्याची प्रेरणा दिली आहे. त्याने स्वतः आपल्या आवडत्या सिनेमांमध्ये काम करून स्वतःची योग्यता सिद्ध करून दाखवली आहे. त्याने असे रोल केले आहेत, जे अन्य कोणत्याही कलाकाराने पूर्वी कधीही केलेले नव्हते. आतापर्यंत लोकांनी माझ्या कामाचे कौतुक केले आहे, ही एक समाधानाची बाब आहे.
सिनेमात काम करण्याचा मुख्य हेतू लोकांचे मनोरंजन करणे हा आहे. त्यात मी सफल झाले आहे. आता लोकांना संदेश देण्याच्या दुसऱ्या उद्दिष्टातही मी सफल होईन, असा विश्वास श्वेता त्रिपाठीने व्यक्त केला आहे. श्वेता “लघुशंका’ नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये काम करणार आहे. त्यात ती अशा मुलीचा रोल करणार आहे, जिचे लग्न ठरले आहे, पण तिला रात्री झोपेतच बिछाना ओला करण्याची सवय असते.