यूपीएससीच्या गुणवत्तेत इंजिनिअर्सच्या बोलबाला

नोकरी सांभाळत यूपीएससीत झेंडा

पुण्याचे क्षितिज किशारे तवरेज यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रॅंक 239 मिळवून यश संपादन केले आहे. “एनआयटीतून बी.टेक झाल्यानंतर स्वयं अध्ययनावर भर देत यूपीएससीची तयारी केली. आतापर्यंत पाचवेळा यूपीएससीची परीक्षा दिली. त्यात तीन वेळा मुलाखतीपर्यंत पोहोचलो. मात्र यश मिळत नव्हते. जिद्दीने नोकरी सांभाळत यूपीएससी उत्तीर्ण झाल्याचा आनंद आहे. क्षितिज सध्या हैद्राबाद येथील नाबार्ड येथे सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. वडील किशोर तवरेज हे प्रशासकीय सेवेत असून, पुण्याच्या नागरी भूमापन जमाबंदी आयुक्‍त कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत,’ असे क्षितिज यांनी सांगितले.

पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निकालात महाराष्ट्रातील 90 पेक्षा अधिक उमेदवारांनी स्थान मिळविले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही यूपीएससीच्या अंतिम निकालात महाराष्ट्रातील उत्तीर्णांचे प्रमाण वाढत आहे. यावर्षी यामध्ये अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या उमेदवारांनी वर्चस्व मिळविल्याचे दिसून येत आहे.

यूपीएससीच्या प्रशासकीय सेवा “आएएस’, विदेश सेवा “आयएफएस’ आणि पोलीस सेवा “आयपीएस’ या पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा अंतिम निकाल शुक्रवारी रात्री निकाल जाहीर झाला. यात 759 उमेदवारांची निवड करण्यात आली. देशातून पहिल्या 50 रॅंकमध्ये महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या निकालात सुमारे 90 उमेदवारांनी यश मिळविणे, ही बाब निश्‍चितच महाराष्ट्राच्या दृष्टीने समाधानकारक आहे.

नचिकेत शेळकेंचेही यश

नचिकेत शेळके याने 167 वा क्रमांक मिळवित केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. मूळचा पुणे जिल्हातील शिरूर तालुक्‍यातील शिक्रापूरजवळ पिंपळे खालचं या गावचा आहे. आई-वडील दोघेही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असून कोणताही क्‍लास न लावता नचिकेतने यूपीएससीत यश प्राप्त केले आहे.

दरम्यान, “द युनिक अकॅडमी’च्या 70 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळविल्याचा दावा क्‍लासचालकांनी केला आहे. युनिकच्या तृप्ती धोडमिसे या राज्यातून पहिल्या आल्या आहेत. सोळाव्या रॅंकने उत्तीर्ण झालेल्या तृप्ती धोडमिसे यांचा निकाल हा आनंद देणारा आहे. देशात तिसरा आलेल्या जुनेद अहमद यांनी अकॅडमीच्या दिल्ली ब्रॅंचमधून मुलाखतीचे मार्गदर्शन घेतले आहे. वैभव गोंदाणे याने पहिल्याच प्रयत्नात 25वी रॅंक मिळविली आहे, अशी माहिती ऍकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.