पिंपरी, दि. 8 – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव 10 ते 14 डिसेंबर या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांसह विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना देण्यात येणार आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे 461 वे वर्ष आहे.
यावेळी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि विश्वस्त यावेळी उपस्थित होते. महोत्सवाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 10 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी विविध धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
10 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांचे व्याख्यान होईल. रात्री 8 ते 10 या वेळेत पखवाज सहवादन होईल. 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 12 दरम्यान सामुहिक अभिषेक, नेत्र व दंत चिकित्सा शिबिर होईल. सायंकाळी 4 वाजता दशावतारी नाट्य, 6.30 वाजता मंदिरांच्या देशा हा कार्यक्रम होईल. रात्री 8.30 वाजता अमर ओक, निलेश परब, सत्यजित प्रभू यांचा अमर बन्सी हा संगीताचा कार्यक्रम होणार आहे.
12 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता उत्तरा केळकर व त्यांचे सहकलाकार यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जीवन गौरव पुरस्कार इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. रात्री 8.30 वाजता गायिका केतकी माटेगावकर, पार्श्व गायक ऋषिकेश रानडे यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होईल.
14 डिसेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता संजीवन समाधीची महापूजा होईल. सकाळी 8 वाजता चिंचवड येथील स्वराज्य ढोलताशा पथकाची मानवंदना होईल. दुपारी 12 वाजता महाप्रसाद आणि रात्री 10 वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधी समोर आणि श्री मंगलमुर्ती वाडा येथे धूपारती होईल. त्यानंतर महोत्सवाची सांगता होईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना गणेश भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळांने केले आहे.