श्री लक्ष्मी देवी अंबाबाई कुंभारगांव यात्रा विशेष

कुंभारगाव येथे श्री लक्ष्मीदेवी अंबाबाई देवीचे पुरातन मंदिर आहे. भक्‍तगण मोठया भक्‍तिभावाने देवीच्या दर्शनासाठी येत असतात. फक्‍त गावातच नाही तर गावाच्या चारही हद्दीवर श्री लक्ष्मीदेवी अंबाबाईची मंदिरे आहेत. गावाच्या संरक्षणासाठीच देवीची स्थापना करण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात.

पूर्वीच्या काळी प्लेग व पटकी विविध साथीचे रोग सर्वत्र पसरले होते. त्यामुळे मोठमोठ्या गावाच्या लोकवस्तीत राहणारे लोक डोंगरमाथ्यावर जावून राहू लागले. तेथेच त्यांनी वस्त्या वसवल्या व लक्ष्मी देवीची स्थापना केली. त्याकाळी बांधण्यात आलेले देवीचे पुरातन मंदिर आजही आहे. नंतरच्या काळात लक्ष्मी देवीच्या परिसरामध्ये वाड्या-वस्त्या वाढू लागल्या. साथीच्या रोगास घाबरून डोंगरावर राहण्यास येणाऱ्या लोकांना लक्ष्मी देवी ह्या जागृत देवस्थानाचा मोठा आधार वाटू लागला.

देवीचा महिमा पंचक्रोशीमध्ये वाढून भक्तांचा ओघही वाढू लागला. संपूर्ण पंचक्रोशीमध्ये देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच राहिले. पूर्वीच्या काळातील वाड्या-वस्त्या या जंगलामध्ये वसल्या होत्या. या वस्त्या लोकसंख्येच्या मानाने लहान असल्यामुळे चोर-दरोडेखोरांची मोठी भिती होती. बचावासाठी नागरिक देवीस साकडे घालत असत. परंतु देवीच्या महात्म्यामुळे कोणताही चोर चोरी करून गावातून बाहेर गेला नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.

प्रतिवर्षी यात्रेनिमित्त श्रींचा पालखी सोहळा व मिरवणूक गावातून काढली जाते. ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरु आहे. येथील कुस्ती स्पर्धा हे पंचक्रोशीचे मुख्य आकर्षण असते. श्रावण महिन्यामध्ये तसेच नवरात्रोत्सवात दर मंगळवारी व शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली असते.

महिनाभर पाटण तालुक्‍यासह जिल्ह्यातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. त्याबरोबरच गावाच्या चारही हद्दीवर असणाऱ्या मंदिरामध्येही दर्शनासाठी गर्दी असते. भाविक व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून डोंगर कपारीतील या मंदिराचा कायापालट होणे गरजेचे आहे. तेथील परिसर व मंदिर सुशोभीकरणासाठी अजूनही निधीची अपेक्षा आहे. लोकसहभागातून प्रत्येक कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न होत असताना श्रींचा सर्वदूर पोहचलेला लौकिक व वाढत्या सोयी-सुविधांचा विचार केल्यास लोकप्रतिनिधींनी बळ देण्याची गरज आहे.

देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कुंभारगावमध्ये शेती, उद्योग व व्यापार या क्षेत्रामधील विकासाची केंद्रे वाढत्या बेरोजगारीसमोर आदर्शवत ठरणारी आहेत. गावातील तरुणवर्ग उद्योग व व्यवसायासह मेट्रो सिटीमध्ये स्थिरावला आहे, हेही महत्वाचे आहे. तसे पाहिल्यास गावास डोंगर उताराची शेती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पाण्याच्या व्यवस्थापनापासून उत्पादनापर्यंतच्या कसोटीत येथील शेतकऱ्यांना मोठ्या कौशल्याने श्रम घ्यावे लागतात. तरीही न डगमगता शेतीमध्ये नवनवे विक्रम गाठण्यात गावातील शेतकरी यशस्वी झाले आहेत.

अलिकडे शेतीमध्ये सदन असणारी ओळख घेवून हे गाव दिवसेंदिवस प्रगतीची पाऊले टाकत चालले आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे जन्मगाव म्हणूनही कुंभारगावची ओळख सर्वदूर पसरली आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून गावास निधी मिळाला आहे. त्यातून अनेक विकासकामे झाली आहेत. त्याचबरोबरच तालुका पातळीवरील सर्वच नेत्यांचे सहकार्य मिळत आहे. गावचा लौकिक व प्रगती अशीच उत्तरोत्तर वाढत राहो हीच शुभेच्छा!…

पाटण तालुक्‍यातील डोंगराळ भागातील कुंभारगावासह हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री लक्ष्मीदेवी अंबाबाईचा महिमा अपंरपार आहे. देवीचा लौकिक सर्वदूर पसरला आहे. प्रतिवर्षी कार्तिकी पौर्णिमेस श्री लक्ष्मीदेवी अंबाबाई देवीच्या यात्रेस प्रारंभ होतो. यात्रेसाठी हजारो भक्‍तगण हजेरी लावतात. यावर्षी बुधवार दि. 13 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी होणाऱ्या गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीने संपूर्ण मंदिर परिसर गुलालमय होतो. यात्रा म्हणजे सर्वांसाठी पर्वणीच असते. यात्रेचे औचित्य साधून श्री लक्ष्मी देवी अंबाबाईची महती सर्वदूर पोहोचवण्याचा केलेला हा प्रयत्न…

– अमित शिंदे कुंभारगाव

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.