श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात गुरूपौर्णिमा साजरी

वाघापूर – दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष, टाळ मृदंगाचा गजर, पादुका आणि मूर्तीवर होणारी पुष्पवृष्टी, मंदिरात केलेली विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट आणि याची देही याची डोळा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जमलेली लाखो भाविकांची गर्दी अशा अतिशय भक्तिमय वातावरणात एकमुखी दत्त मंदिरात गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. या सोहळ्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथील दत्त मंदिरात गुरूपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी पहाटेपासून दर्शनाचा लाभ घेतला. परमपूज्य सद्‌गुरु नारायण महाराज यांच्या आशिर्वादाने मंदिरात पहाटे देवांना अभिषेक घातल्यानंतर सकाळची आरती झाली. त्यानंतर होमहवन होऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी आमदार उल्हास पवार, माजी खासदार अशोक मोहोळ, क्षेत्र पंढरपूर येथील देवस्थानचे माजी विश्‍वस्त शशिकांत पागे यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करण्यात आला. यावेळी दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर, नीरा मार्केट कमिटीचे सभापती बबन टकले, अरुण जाधव, दीपक साळुंके, अनंत घाडगे, प्रकाश बाफना, राम बोरकर, रोहित अभंग, विनायक काळे, दादा भुजबळ, लक्ष्मण धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यक्रम विधी पार पडल्यानंतर दुपारी उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. तसेच त्यानंतर विविधरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीत मुखवटे आणि पादुका ठेऊन टाळ-मृदंग आणि ढोल-ताशांच्या गजरात पालखी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच महाआरती झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. यावेळी भजन संगीताचा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू होता. पहाटे दीड वाजता आरती झाली. त्यानंतर ग्रहणाच्या काळात होमहवन करण्यात आले आणि मोठ्या उत्साहात गुरूपौर्णिमा सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)