सांगली – राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून आयएल आणि एफएस प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. सत्तासंघर्षाची सुनावणी होत असतानाच जयंत पाटील यांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यावरून आता सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सांगली जिल्ह्यात ‘भाजपच्या नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा,’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ED ने नोटीस बजवल्याच्या निषेधार्थ हे बॅनर लावण्यात आले आहे. जत राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने जतच्या एसटी स्टँड येथे चक्क डिजिटल बोर्ड लावले आहेत. ‘भाजपच्या नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा,’ असा मजकुरचा बॅनरवर लावला आहे. जयंत पाटील यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचा जाहीर निषेध हा डिजिटल बोर्ड लावून करण्यात आला आहे. सध्या या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. 2018 मध्ये याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. यात मनी लाँड्रिंग प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानांतर अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.