नवी दिल्ली: सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांसमवेत ‘परीक्षेवर चर्चा २०२०’ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मोदी यांनी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दहावी बारावी मंडळाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताण न घेता परीक्षेत बसण्याचा सल्ला मोदींनी दिला. मोदींनी शिक्षणाशी संबंधित अनेक खास गोष्टी सांगितल्या. दरम्यान ‘परीक्षेवर चर्चा’ संदर्भात बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.
#ParikshaPeCharcha2020 karne se pehle degree ka kagaz dikhao…#justasking
— Prakash Raj (@prakashraaj) January 20, 2020
ट्विटच्या माध्यमातून अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींना त्यांची पदवी दाखविण्यास सांगितले आहे. प्रकाश राज नेहमी वर्तमान विषयावर आपले मत जनतेसमोर मांडत असतात. आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी लिहिले आहे की, “परीक्षेवर चर्चा करण्यापूर्वी डिग्री पेपर दाखवा …”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या ‘परीक्षेवर चर्चा’ या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना ताणतणाव कमी व्हावा. दिल्लीत आयोजित ‘परीक्षेवर चर्चा’ च्या तिसर्या सत्रात पीएम मोदी यांनी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांशी परीक्षेचा ताण दूर करण्याबाबत संवाद साधला. या कार्यक्रमात सुमारे २ हजार विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी झाले होते.