बेल्हे – बेल्हे (ता. जुन्नर) येथे श्री भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांनंतर बैलगाडा घाटात “भिर्रर्र..’ची आरोळी घुमल्याने बैलगाडा शौकिनांचा उत्साह ओसंडून वाहत होता. बेल्हे येथे श्री भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त बुधवारी (दि. 23) काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.
गुरुवारी (दि. 24) यात्रोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. संयोजकांच्या वतीने बैलगाडा शर्यतीसाठी घाटाची दुरुस्ती करून सुसज्ज बैलगाडा घाट तयार करण्यात आला. यावेळी सरपंच पांडुरंग साळवे (साकोरी) या गाडा मालकाने 31 हजार रुपयांचा प्रथम क्रमांक, पप्पू गुंजाळ (रानमळा) यांनी 25 हजार रुपयांचा द्वितीय क्रमांक, काशिनाथ नवले (मंगरूळ) यांनी 21 हजार रुपयांचा तृतीय क्रमांक, निमगाव सावा येथील चैतन्य पवार यांनी 15 हजार रुपयांचा चतुर्थ क्रमांक मिळवला.
आणे येथील गाडा मालक देविदास गाडेकर यांनी घाटाचा राजाचा मान मिळवला. बैलगाड्यासाठी चषक, तसेच टेबल फॅन, एलईडी टीव्ही, सायकल, शिवळटी (जाडी), सिलिंग फॅन आदी वस्तूरुपाने वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली होती. यावेळी भंडाऱ्याची उधळण करत बैलांच्या वाजतगाजत मिरवणूका काढण्यात येत होत्या. बैलगाडा घाटाच्या दोन्ही बाजूने बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते.
यावेळी वाजंत्री मंडळी, हॉटेल व्यावसायिक, खाद्य विक्रेते, खेळणी, संसारोपयोगी साहित्य विक्रेते आदी छोट्या – मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने लावून आर्थिक प्राप्तीची पर्वणी साधली. जागरे जुन्नरच्या नायब तहसीलदार सचिन मुंढे, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पशुवैद्यकीय अधिकारी शेजवळ यांच्यासह परिसरातील गाडामालक, बेल्हे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.