Prakash Ambedkar on Narendra Modi| लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टिकास्त्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी इचलकरंजी येथे पार पडलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘देशावर कर्ज उभा करुन मी संन्यास घेतो असे सांगतील. त्यामुळे देशाला बुडवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी द्यायची का? हे तुम्ही ठरवा,’ असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? Prakash Ambedkar on Narendra Modi|
“सध्याचे सरकार डाकूंचे सरकार आहे. देशावर 100 रुपयांपैकी 24 रुपयांचे कर्ज होते. या डाकू सरकारने हे कर्ज 84 रुपयांवर नेले. 2014 ते 2024 या कालावधीत 24 रुपयावरुन 84 रुपयांवरती नेले. जागतिक बँकेने भारताला इशारा दिला. आपला पगार समजा 10 हजार आहे आणि बँकेचा 10 हजारांचा हफ्ता असेल तर आपली चूल कशी पेटणार ? सनातन्यांना पुन्हा सत्तेत आणले तर दरवर्षी कर्ज वाढत राहणार आहे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“एका बाजूला देशाला बुडवणारा पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूने धारकऱ्यांच्या माध्यमातून दंगली पेटवल्या जात आहेत. सर्व दंगली धारकऱ्यांकडून घडवल्या जात आहेत, असा माझा आरोप आहे. एकदा आपल्याकडे पैसा राहिला नाही तर घरदार विकायची वेळ येईल. सध्या देशावर 84 रुपयांचे कर्ज आहे. हे 2026 ला 100 रुपयांचे कर्ज करतील. देशावर कर्ज उभा करुन मी सन्यास घेतो असे सांगतील. देशाला बुडवून हे सन्यास घेतील. देशाला बुडवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी द्यायची का? हे ठरवा,” असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.
….त्यांना पुन्हा पंतप्रधान करता कामा नये
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी वायफळ किंवा चुकीचं काही बोलत नाही. मोदींच्या सरकारने येथील एअरफोर्सची वाट लावली. मनमोहन सिंगांच्या काळात 135 विमाने फ्रान्सकडून विकत घ्यायची होती. सनातन वाल्यांनो किती राफेल आले सांगा आणि किती विकत घ्यायचे होते तेही सांगा. केवळ 35 विमाने आली आणि उरलेले 100 विमानं कधी येणार आहेत? ज्यांनी या देशाची संरक्षणाशी खेळ केला त्यांना पुन्हा पंतप्रधान करता कामा नये, हे लक्षात घ्या.” दरम्यान, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांची जागा वाटपाबाबत चर्चा होत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
हेही वाचा:
गुजरातच्या मोरबीमध्ये भीषण दुर्घटना ; निर्माणाधीन मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळला, पहा व्हिडिओ