प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -महापालिकेच्या पर्वती जलकेंद्रातील टॅंकर पॉइंटच्या शेजारी पंप चालू-बंद करण्याची नियंत्रण खोली आहे. या खोलीत बटन सुरू करताना शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत कर्मचारी गंभीर भाजला. धक्कादायक बाब म्हणजे, घटना घडली तेव्हा येथे एकही सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता.
या घटनेत लाला बांदल हे जखमी झाले आहेत. ते पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत. बांदल स्वत: जळालेल्या अवस्थेत जलकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आले. त्यानंतर त्यांना तातडीनं सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
पर्वती जलकेंद्रातील पंप सकाळी सात वाजता सुरू केला जातो. ते काम बांदल यांच्याकडे होते. पॉइंट सुरू करण्यासाठी गेले असताना त्यांनी बटन दाबताच शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीचा लोळ बांदल यांच्या अंगावर आला. ते तसेच बाहेर पळत आले. रात्रीच्या शिफ्टच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले. त्यांनी बांदल यांना तत्काळ रुग्णालयात हलविले. नंतर ही माहिती अधिकाऱ्यांना कळविली.
जळालेल्या अवस्थेतच बाहेर
जळालेल्या अवस्थेत असल्याने बांदल यांना कोणीच ओळखले नाही. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना नाव विचारले असता, त्यांनी आपले नाव बांदल असल्याचे सांगत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक दिला. मात्र, घरी कळवू नका, असे सांगितले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलाविली. मात्र, ती यायलासुद्धा 20 ते 25 मिनिटे गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
वारंवार घडताहेत प्रकार
जलकेंद्रात उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला असून, त्या वीजवाहक तारा कुरतडतात. त्यामुळे वारंवार शॉर्टसर्किटचे प्रकार घडतात. असे असतानाही गांभीर्याने पाहिले जात नसल्याने दुर्घटनेला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या घटनेनंतर “महावितरण’कडून आग लागलेल्या ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. मात्र, आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे उद्या राज्य शासनाचे विद्युत अभियंता घटनास्थळाची पाहणी करणार असून, पोलीसही या खोलीतील सीसीटीव्ही तपासणार आहेत. त्यामुळे नेमका प्रकार कशामुळे घडला हे आताच सांगता येणार नाही.
– अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख