पुणे, दि. 4 -दसऱ्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. 24 सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान सहा हजार 912 वाहनांची नोंद पुणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) मध्ये झाली आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर नागरिक वाहन खरेदी करतात किंवा अगोदर वाहन खरेदी करून विजयादशमीच्या दिवशी घरी आणतात. मागील दोन वर्षे करोनामुळे वाहन खरेदी मंदावली होती; पण आता करोना परिस्थिती निवळल्यानंतर नागरिकांचा पुन्हा वाहनांच्या खरेदीकडे कल वाढला आहे.
दोन वर्षांच्या तुलनेत नवरात्र उत्सवात वाहनांच्या खरेदीत दुपटीने वाढ झाली आहे. 24 सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान सहा हजार 912 वाहनांची नोंद झाली आहे. यात चार हजार 557 दुचाकी वाहनांची नोंद झाली आहे, तर एक हजार 936 चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत वाढ होत आहे. दहा दिवसांत देखील हेच चित्र पाहायला मिळाले. चार हजार 814 पेट्रोलच्या वाहनांची नोंद झाली आहे, तर 796 ई-वाहनांची नोंद झाली आहे. तर सीएनजीचे वाढते दर लक्षात घेता, त्याचा फटका वाहन विक्रीला बसल्याचे पाहायला मिळाले.
दहा दिवसांत झालेली वाहन खरेदी
दुचाकी – 4557
चारचाकी – 1936
पेट्रोल – 4814
इलेक्ट्रीक – 796
सीएनजी – 667