10 जण जखमी, संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
डेन्वर,(अमेरिका) – अमेरिकेत डेन्वर येथे बास्केटबॉलच्या सामन्यानंतर झालेल्या गोळीबारात किमान 10 जण जखमी झाले आहेत. या गोळीबारातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नगेटस या संघाने स्पर्धा जिंकल्यानंतर या संघाच्या समर्थकांकडून जल्लोष केला जात असताना हा गोळीबार झाला. रात्री 12.30 च्या सुमारास झालेल्या या गोळीबारामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत, असे डेन्वर पोलिसांनी म्हटले आहे.
या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या अन्य 7 जणांपैकी एक जण या गोळीबारातील प्रमुख संशयित आहे. तो जरी जखमी झाला असला तरी त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
सोमवारी मध्यरात्री संपलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नगेट्स संघाने मियामी हिट या संघाचा पराभव केला. मात्र, जल्लोष करणाऱ्या क्रीडाप्रेमींवर गोळीबार करावा लागावा, यासाठी काय कारण घडले याचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. मध्यरात्री आनंद साजरा होत असताना हा गोळीबार झाला होता.