नवी दिल्ली – त्रिपुरामधील “त्रिपरा स्टुडंटस फेडरेशन’ या आदिवासी विद्यार्थी संघटनेने 12 तासांसाठी उद्या (सोमवारी) त्रिपुरा बंदचे आवाहन केले आहे. कोकवोरोक ही आदिवासी भाषा रोमन लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात यावी आणि राज्यघटनेमधील 125 वी घटनादुरुस्ती मंजूर करण्यात यावी, या मागण्यांसाठी या “त्रिपुरा बंद’चे आवाहन केले आहे.
कोकवोरोक ही तिबेटी बर्मा प्रदेशातील प्रादेशिक भाषा असून, या भाषेला रोमन लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे आणि राज्यघटनेतील 125 वी घटनादुरुस्ती मंजूर करण्यात यावी, असा आग्रह “टीएसएफ’च्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून धरला जातो आहे.
याच मागण्यांसाठी संघटनेने राजभवनावर मोर्चादेखील काढला होता. मात्र सरकारकडून या मागण्या मंजूर होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्यामुळे 12 तासांच्या बंदचे आवाहन केले गेले असल्याचे “टीएसएफ’च्या वतीने सांगण्यात आले.
राज्यघटनेतील 125 वी घटनादुरुस्ती मंजूर करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2019 रोजी राज्यसभेमध्ये विधेयक मांडण्यात आले आहे. तत्कालीन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हे विधेयक मांडले होते. ईशान्येतील आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या चार राज्यांमध्ये असलेल्या वित्त आयोग राज्यघटनेतील तरतुदींमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव या विधेयकाद्वारे मांडण्यात आला आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत “टीएसएफ’ने टिपरा मोथाला पाठिंबा दिला होता. टिपरा मोथाने 60 सदस्यीय विधानसभेत 13 जागा जिंकल्या होत्या.