पुणे : पत्नीने भांडणात संगणक अभियंता पतीची फसवणुक करुन लाल कुंकु, मंतरलेले लिंबु, अंथरुणात मंतरलेले तांदुळ टाकून आघोरी प्रकार केले. तसेच मांत्रिकाचे ऐकले नाही तर खानदानाचा नाश होईल असे धमकावुन ब्लॅकमेल करत तिच्या कुटूंबीयांनी एक कोटी रुपयांची मागणी केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानूसार कोथरुड पोलिसांनी पत्नीसह सासरच्याकडील 12 जणांविरुद्ध जादुटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कोथरुडमधील कुंबरे पार्क सोसायटीत 11 मार्च 2020 पासून आतापर्यंत घडला आहे. याप्रकरणी कुलदीप शिवाजीराव जाधव (40, रा.भूगाव, पौड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याची पत्नी व तिचे आई-वडिल आणि इतर नातेवाईकांवर नरबळी, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना एक 15 व एक सहा वर्षाचा मुलगा आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे पत्नीशी पटत नव्हते. त्यामुळे त्या माहेरी निघून गेल्या होत्या. मध्यंतरी त्यांच्या तडजोड झाली. त्यानंतर सुमारे 6 वर्षे त्यांनी संसार केला. त्यानंतर मार्च 2020 मध्ये फिर्यादी यांच्या पत्नीने सासरच्या लोकांच्या सांगण्यावरुन फिर्यादी यांची फसवणूक करुन त्यांना लाल कुंकु, मंतरलेले लिंबु, तांदुळ अंथरुणात टाकणे असे अघोरी प्रकार केले.
त्यांच्या ओळखीच्या देवबाप्पा नावाच्या मांत्रिकाकडे दिव्य शक्ती आहे. त्याचे ऐकले नाही तर तुझ्या खानदानाचा नाश होईल, असे धमकाविले. त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या. पत्नी व तिच्या सासरकडील लोकांनी कट रचून संगनमत करुन फिर्यादी व त्याच्या कुटुंबियांला ब्लॅकमेल करुन एक कोटी रुपयांची मागणी केली. तर तीच्या नातेवाईकांनी पैसे दिले नाही तर तुझ्याविरुद्ध तुझ्या पत्नीला खटले दाखल करायला सांगतो असे म्हणत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
फिर्यादी कुलदीप व त्याच्या नातेवाईकांवर त्याच्या पत्नीने गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये कौटुंबिक हिसांचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर फिर्यादी याने न्यायालयात धाव घेऊन फिर्यादी दाखल केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी केळकर यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश कोथरुड पोलिसांना दिला आहे.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.