सांगली : युती झाली किंवा नाही झाली तरी या निवडणुकीत शिवसेनेचे सामर्थ्य दाखवून देऊ आणि आपला एक ना एक उमेदवार निवडून आणू, असे प्रतिपादन शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केले आहे.
सांगलीत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. रावते यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात रावते यांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. युतीच काय होईल माहीत नाही. पण विधानसभेची निवडणूक शिवसेना जोशाने लढवणार आहे, असेही ते म्हणाले.
रावते म्हणाले, विधानसभा तोंडावर आली आहे. मेळाव्याची वेळ 11 वाजताची होती, तुम्ही 11 ला यायचे सोडून 12 ला येता हे बरोबर नाही. शिवसेना कार्यकर्त्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. शिस्त हीच शिवसेना आहे, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. वेळाने येणाऱ्या कार्यकर्त्यांना मागे बसवा आणि त्यांना हार घाला, असा टोलाही त्यांनी लगाविला. दरम्यान, मेळाव्याच्या ठिकाणी येतानाच गाडीतून उतरल्यानंतर रावते यांनी समोर आलेल्या पदाधिकाऱ्याच्या शर्टाची बटने लावली आणि शिवसेनेची शिस्त कशी असायला हवी, हे त्या पदाधिकाऱ्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केला.